राष्ट्रीय कॉल सेंटर : +91-11-23978046 | राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष : 020 26127394 | टोलफ्री हेल्पलाइन : 104

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम कोरोनाविरुद्ध निर्णायक ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

मुख्यमंत्र्यांकडून अमरावती विभागाचा आढावा

 

  • आवश्यकता पडल्यास जिल्हास्तरावर जम्बो कोविड सेंटर

  • घरोघरी सर्वेक्षणाची माहिती ॲप द्वारे तात्काळ भरावी

अमरावती, दि २६ : सध्या उपलब्ध असलेली आरोग्य यंत्रणा, मनुष्यबळ यावर कोरोनाविरुद्ध लढा द्यावयाचा आहे. आरोग्य सुविधा निर्माण करण्यावरही मर्यादा आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधेवर ताण येणार नाही, यासाठी राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचता येणार आहे. त्यामुळे ही मोहीम कोरोनाविरुद्ध निर्णायक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्यात प्रामुख्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम’, घरोघरी जाऊन करण्यात येणारे सर्वेक्षण आणि कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी नागरिकांमध्ये करावयाच्या जनजागृतीबाबत आदीबाबत त्यांनी माहिती घेतली.

या बैठकीला अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू, बुलडाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, वाशिमचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलिस महानिरिक्षक कृष्णकुमार मिना, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, एस राममूर्ती, जितेंद्र पापळकर, ऋषिकेश मोडक, एम. डी. सिंह आदी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, सध्या आहे त्या रुग्णसंख्यापेक्षा दुप्पट रुग्णसंख्या झाल्यास आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येणार आहे. त्यामुळे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून कोरोनासह इतर आजाराचे रुग्ण शोधण्यात येत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे. घरोघरी जाऊन करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाची माहिती ॲपद्वारे तात्काळ माहिती भरावी. त्यामुळे या सर्वेक्षणाची अंमलबजावणी दक्षतापूर्वक होत असल्याची खात्री होईल. मास्कचा वापर, परस्परांमध्ये अंतर राखणे, तसेच हात धुणे या सवयी आता अंगीकाराव्या लागतील. यामुळे कोरोनाचा प्रसार किंवा आळा घालण्यास मदत होईल.

राज्यातील जनजीवन सुरळीत आणण्यासाठी अनेक क्षेत्रे खुली करण्यात येत आहेत. ज्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपली जबाबदारी कळण्यास मदत होईल. ही मोहीम नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कार्य करीत आहे. राज्यस्तरावरही या मोहिमे अंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील नो मास्क, नो सवारी या सारखे उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. अशा प्रकारचे उपक्रम राबवून नागरिकांना कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात खाटांची संख्या, ऑक्सीजन, औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहे. यानंतरही आवश्यकता पडल्यास जिल्हास्तरावर जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी तयारी करण्यात येईल. सध्या अनलॉक ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे काम करणारा तरुण वर्ग घराबाहेर पडेल. त्यांच्या माध्यमातून हा वायरस घरात जाऊ शकेल. त्यामुळे घरातील वयस्कर लोकांना याची लागण होऊ शकेल. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची सुरक्षा बाळगावी.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीपर्यंत तरी प्रत्येक नागरिकाला खबरदारी घ्यावी लागेल. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचे सैनिक होऊन कोरोनाविरुद्ध लढावे लागेल. शासनालाही आरोग्यविषयक सुविधा निर्माण करताना सीमारेषा आखावी लागेल. तसेच आवश्यक असलेल्या औषधे आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून द्यावे लागेल. सध्यातरी कोरोनाची लस उपलब्ध होण्याची कोणतीही शक्यता दिसून येत नाही. या लसी उपलब्ध झाल्यानंतरही त्याची परिणामकारकता किती असेल याबाबतही चर्चा होत आहे. तसेच लसीकरणाची मोहीम किती वेळ चालेल, याबाबतही विचार करावा लागणार आहे.

कोरोनाविरूद्धच्या या मोहिमेत आता प्रत्येक नागरिकांना आपली जीवनशैली बदलावी लागेल. मास्क, हात धुणे, अंतर राखणे यामुळे कोरोनाच्या प्रसाराला शाळा घालण्यास मदत होत आहे. त्यामुळे या त्रिसूत्रीचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने पुढाकार घ्यावा. नागरिकांना समजेल अश्या बोली भाषा आणि स्थानिक लोककलावंताच्या मदतीने ही मोहीम गावागावात पोहोचता येणे शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

 

 


कोरोनाबाधित रूग्ण

किमान एक रूग्ण आढळलेल्या क्षेत्रातील कोरोना बाधीत रूग्णांची आकडेवारी...